Sunday, May 29, 2011

व्यवस्था व आपण

जेव्हा व्यवस्थाच माणसाला षंढ बनविते


तेव्हा आपण नाही काही करु शकत

प्रत्येक व्यवस्थेचा गर्भ माणसाच्या गर्भाबरोबरच

पोसल्या जातो हे का नाही आपण ध्यानात घेत



माणसाचे जिन्स जर बदलता येत नाहीत

तर व्यवस्थेचे जिन्स कसे बदलणार ... ?

व्यवस्थेला किती ही शिव्या दिल्या,

निंदा नालस्ती केली,जाळण्याची, गाडण्याची

भाषा केली तरी व्यवस्था नाही बदलत

किती क्रांत्या झाल्या, सुर्याचा प्रकाश पृथ्वी वर

आणण्याची भाषा केली, अंधार गिळ्ण्याची

व हटवण्याची भाषा केली

नव नवे संकल्प केले

तरी व्यवस्था ही बदलत नाही अन माणसे ही

राजकिय व सामाजिक क्रांतीच्या वल्गना करा

किंवा आध्यात्माच्या आणि आत्म्याच्या उन्नतीचे

गारुड मांडा

कुत्र्याच्या शेपटा सारखं सतत वाकडं

राहणार माणसाचे नसिब....

नाही रे बदलत ....



एकटा मनुष्य संत, विभुती वगॆरे होऊ शकतो

परंतु समाज नाही

गटारात चुळुक भर शुध्द पाणी टाकल्याने

गटार तर शुध्द होत नाहीच

पण टाकलेले चुळुकभर शुध्द पाणी ही

दुषितच होते

माणुस आणि समाजाचे ही असेच आहे



माणसाला आत्मा असतो

समाजाला असतं एक भगभगणारं

वासनेचं लिंग

चित्र विचित्र वासनेनं रटरटलेलं

शरीर घेऊनच समाज वावरत

असतो आपल्या सर्वांच्या मनात,

सदा अस्वस्थ अश्वत्थामा सारखा

किती तरी येशु, बुध्द, गांधी, कृष्ण

मार्क्स, ग्यानेश्वर, तुकाराम,साक्रेटीस,

मार्टीन ल्युथर, आंबेडकर

पचविले नाहीत का या निर्लज्य समाजाने

अरे ..समाज हा सहस्त्र विषारी बुबळाचा

आक्टोपस आहे

तो खातो फक्त माणसांना

त्यांच्या इच्छा, आकांक्शाना व स्वप्नांना

गर्भाबरोबरच घेऊन आलेल्या

समाजावर आपण पोसले जातो

अन.. त्यामुळे त्याला बदलण्याची भाषा

वायफळ ठरते

आपण विसरतो कि कुणा गाढवाने

जन्माला येतांना नव्हती दिली

आपल्याला ग्यारंटी, सुखी आयुष्याची,

न्यायाची व समतेची

म्हणुन विसरु नको

दहा हजार वर्षापुर्वीच्या माणसांचा

व आताच्या माणसाचा

मेंदु व पोटाचा आकार व रचना

सारखीच आहे.

अन विसरु नको...

वेशा व सती सावित्री स्त्रीला

सकाळी धुक्यात पडणा-या स्वप्नांची

जातकुळी सारखीच असते.



सुधाकर

No comments:

Post a Comment