Sunday, May 29, 2011

अरे पावसा ...

अरे पावसा ... का बरे तु असा येतो




तु ऎन दुपारी

असा का अंधार करतो

तु प्रत्येक वेळी येण्याची

मनाला चाहुल का देता

तु कोसळण्याआधी

आसमंत का गोंजारतो

पक्षांच्या पंखामध्ये

हवेचे शिड का भरतो

तु मल्हार राग गाण्याआधी

असा जोगिया का गातो



अरे पावसा ... का बरे तु असा येतो



मंदीरातील ते मंत्रोच्चार

मग का असे सादळती

मंदीरातील सा-या घंटा

तुझे ढोल का बडविती

मंदीराच्या त्या मंडपावर

तु असा का आवाज करतो

शंकरापुढील बिल्व प्रसादावर

का रे मग मुंगळ्यांची दाटी

मग त्या घामट शेजारतीला

तु आर्द्र आरती का होतो...

आसमंतास ओले करतांना

ईश्वरास का कोरडा ठेवतो..

अरे पावसा ... का बरे तु असा येतो



तु धरितीस मग

हिरवा शालु देतो

अरे को-या शालुवर

पुन्हा का असा वेडा होतो

प्रेमाची ही वेडी रीत

ती का बरे उधळते प्रित

त्या प्रितीचा मग सुगंध

रानावनात भिरभिरतो

मातीच्या मग कणाकणात

निर्मितीचा गंध ते जाळतो..



अरे पावसा ... का बरे तु असा येतो



शेतात मग चाले

शेतकामाची गडबड घाई

बिचा-या शेतक-याला

तु का बरे उसंत देत नाही

तु आषाढात रप रप पडतो

अन श्रावणात वाकुल्या दावी

भाद्रपदात मात्र तु

ठिय्या धरुन राही

बिचा-या शेतक-याने

किती सोसाव्या तुझ्या लहरी

परि तो शांत मनाने

तुझेच आभार मनी मानी

उभ्या पिकाकडे बघुन

तो देई त्रुप्तीचा ढेकर

उद्याच्या वेडया स्वप्नांचे

तो आजच इमले बांधी

तु कुणा देई भरघोस

कुठे उन्हाळा भरी

दुष्काळाच्या आगीत बिचारा

शेतकरी पिसून येई

कुठे अतिव्रुष्टीने

तु डोळ्यात पाणी आणतो

पुराच्या पाण्याबरोबर

तु आमचे संसार नेतो



अरे पावसा ... का बरे तु असा येतो



सुधाकर

No comments:

Post a Comment